अहिल्यानगर- तालुक्यातील बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चैताली अप्पासाहेब काळे हिने सलग दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारली आहे. तिला चषक प्रदान करून गौरविण्यात आले. एव्हरेस्ट अॅबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. सलग दुसऱ्यांदा चैताली हिने नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
चैताली काळे ही बाबुर्डी घुमट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वीत शिकत आहे. प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब काळे यांची ती कन्या आहे. एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या चैताली काळे हिने विविध स्पर्धेत बाजी मारली आहे. चैताली काळे हिला वैशाली माने यांच्यासह आई-वडिलांनी मोलाचे मार्गदर्शन केले. चैताली काळे हिने स्पर्धा परिक्षेत बाजी मारल्याने बाबुर्डी घुमट ग्रामस्थांच्यावतीने बुधवारी (दि.३०) तिचा सत्कार करण्यात येणार आहे.

सत्कार सोहळ्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने मनोज परभाणे यांनी खास पुढाकार घेतला आहे. काळे कुटूंबियांकडे आदर्श शेतकरी म्हणून पाहिले जाते. प्रचंड कष्ट करून फळबागांच्या माध्यमातून त्यांची शेती बहरली आहे. त्यांच्या शेतात डाळिंब व संत्रा या फळबागा आहेत. त्या फळबागा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आवर्जून येत असतात. शेतात नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी करत असतात. म्हणूनच तर काळे कुटूबियांचा सल्ला परिसरातील शेतकरी घेतात.
चैताली काळे हिच्या यशाबद्दल दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक राजेंद्र झोंड, बाबुर्डी घुमट सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब लांडगे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कैलासराव बोठे, दत्तूबा काळे, अप्पा काळे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.