अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी भागातील मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर छापा घालून एक लाख ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वांबोरी येथील मावाचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल ऊर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव (वय ३०, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. तर, त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पु गोरक्षनाथ जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) पसार झाला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजित जाधव, विशाल तनपुरे यांचे पथक नेमून राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माहिती काढून कारवाईसाठी रवाना केले. दि. १८ जुलै २०२५ रोजी पथक राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, पथकास गोपनीय मिळाली की, पप्पू जाधव हा वांबोरी ते देहरे जाणारे रोडलगत, मोरे वस्ती, वांबोरी येथे एका घराच्या खोलीमध्ये मशीनने सुगंधी तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी छापा टाकला असता एक जण इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला. त्याने राहुल जाधव असे नाव सांगितले. त्याचा भाऊ आणि तो दोघे मिळून मावा तयार करीत असल्याचे सांगितले.
पथकाने घटनास्थळावरून १ लाख ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल त्यात १५ किलो सुगंधीत मावा, १० किलो सुपारी, १ इलेक्ट्रीक मोटार व मशीन, एक वजनकाटा, २ किलो चुना, सुगंधीत तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.