अहिल्यानगर- महापालिका हद्दीतील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगले करिअर करता यावे, यासाठी महापालिकेने २००७ मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. सुमारे ११ वर्षात केंद्रातून दीडशे विद्यार्थ्यांना नोकरीची दारे उघडली. स्पर्धा परीक्षा केंद्राने श्रेणी एकचे अधिकारी घडविले. साधारण आठ वर्षापूर्वी तत्कालीन पदाधिकारी आणि प्रशासनाच्या वादात केंद्र बंद पडले.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली केल्या आहेत. फर्निचर व टेबल ग्रंथालयासाठी निविदा काढली आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अहिल्यानगर महापालिकेने ५ एप्रिल २००७ रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या इमारतीत मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. हा उपक्रम राबविणारी अहिल्यानगर महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली होती. नंतरच्या काळात काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी इमारत व्हावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली.
त्या इमारतीला स्व. प्रमोद महाजन असे नाव देण्यात आले. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी तब्बल ११ वर्षे स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून ११ वर्षे काम पाहिले. त्यानंतर पदाधिकारी आणि प्रशासनाच्या वादात केंद्र बंद पडले.
मध्यंतरीच्या काळात महापालिका आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुदही केली होती. मात्र, नंतर तो प्रस्ताव मागे पडला. मनपाने स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत मार्केट विभागाकडे वर्ग केली. ती इमारत केंद्र सरकारच्या कौशल्या विकास प्रकल्पाकडे वर्ग करावी, तसे पत्रही आले होते. त्या इमारतीत कोविड काळात आरोग्य केंद्र सुरू केल्याने इमारत मनपाकडे राहिली.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त पंकज जावळे -यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव ठेवला. तसे प्रयत्नही केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही. शहराचे आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बंद पडलेले स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे बंद पडलेले स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
त्यासाठी इमारतीतील फर्निचर, टेबल अंतर्गत सुविधा पुरविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून, लवकरच केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्यानगर महापालिकेच्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रासाठी निधी दिला होता. मात्र, तो निधी अद्यापि मिळाला नसल्याचे समजते. आ. तांबे यांचा निधी मिळाल्यास स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो.
स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी मनपा फंडातून निधीची तरतुद केली आहे. त्या निधीतून टेबल, खुर्चा आणि इमारतीच्या आतील फर्निचर, वायरिंग अशी कामे केली जाणार आहे. त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील सुविधांचे काम झाल्यानंतर तत्काळ केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक
महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक अधिकारी घडले. मध्यंतरी केंद्र बंद होते मात्र, केंद्र सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा होता. महापालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ही बाब स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे. विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रात संगणक लॅब उपलब्ध करून केंद्र डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.