भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या नोटांसारख्या हुबेहूब बनावट नोटा छापण्याचा कारखाना नगर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. बनावट नोटांचे हे रॅकेट चालविणाऱ्या एकूण ७ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ५९ लाख ५० हजार रुपयांच्या ५०० च्या बनावट चलनी नोटा, २ कोटी १६ लाखांच्या बनावट नोटा तयार झाल्या असत्या एवढे कागद व शाई इत्यादी प्रकारचे साहित्य तसेच २७लाख ९० हजार ६०० रुपये किंमतीचे बनावट नोटा तयार करण्याचे अत्याधुनिक छपाई मशिन, संगणक इत्यादी साहित्य असा ८८ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कालुबर्ने, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, स.पो.नि. प्रल्हाद गिते उपस्थित होते. याबाबत माहिती देताना अधिक्षक घार्गे पुढे म्हणाले की, स.पो.नि. गिते यांना २७ जुलै रोजी रात्री माहिती मिळाली की, दोन इसम एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत असुन त्यांच्याकडे पावशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आहेत आणि ते आंबीलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देवुन सिंगारेट खरेदी करत आहेत, ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकाला सोबत घेत आंबीलवाडी शिवारात निखील शिवाजी गांगडे (वय २७ रा. कॉनळी, ता. कर्जत), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) यांना पकडले.

त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांचेकडे ८० हजार रुपयांच्या ५०० रुपये दराच्या बनावट चलनी नोटा गिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, या गुन्ह्याचा अधिक तपास करताना बीड जिल्ह्यातुन प्रदिप संजय कापरे (वय २८ रा. तिंतरवणी ता. शिरूर कासार जि. बीड) तसेच छत्रपती संभाजीनगर मधुन मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४० रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (वय ५३, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७, रा. निसर्ग कॉलनी पेठेमगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर), अनिल सुधाकर पवार (वय ३४ रा. मुकुंदनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर) यांना पकडले.या रॅकेट चा मुख्य सूत्रधार अंबादारा रामभाऊ रातागे (रा. शहर टाकळी ता. शेवगाव) हा अद्याप फरार आहे.
त्याचा शोध घेतला जात आहे. या आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील वाळुंज एमआयडीसीत एक घर भाड्याने घेवून त्यामध्ये बनावट नोटा तयार करण्याचा छापखाना असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून त्या घरातून ५१ लाख ५० हजार रुपयांच्या ५०० च्या बनावट चलनी नोटा, २ कोटी १६ लाखांच्या बनावट नोटा तयार झाल्या असत्या एवढे कागद व शाई इत्यादी प्रकारचे साहित्य तसेच २७ लाख ९० हजार ६०० रुपये किंमतीचे बनावट नोटा तयार करण्याचे अत्याधुनिक छपाई मशिन, संगणक इत्यादी साहित्य असा ८८ लाख २० हुगर ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी तपास पथकातील प्रत्येक अधिकारी, पोलिस अंमलदार यांचे अभिनंदन केले. नगर तालुका पोलिसांनी केलेली ही कारवाई गेल्या राज्यातील मोठी कारवाई असल्याचे सांगत या तपास पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.