अहिल्यानगर- तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार न घेतल्याच्या कारणावरून ठाणे अंमलदाराला एकाने शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
राकेश छबुराव गुंजाळ (रा. प्रतिमा कॉलनी पाईपलाईन रोड अ.नगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश साठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे ठाणे अंमलदार ड्युटीवर असताना, एका महिलेची तक्रार नोंदवण्याचे काम करीत होते.

त्यावेळी राकेश गुंजाळ त्यांच्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तक्रार नोंदविण्याची मागणी करीत आमची तक्रार घेत नाहीत असे म्हणून आरडाओरडा केला. ठाणे अंमलदारास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चांगदेव आंधळे करीत आहेत.