श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा सुट्टीवर घरी येत असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि.१६ जुलै रोजी घडली. ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे या जवानाचे नाव आहे. त्यांचा अंत्यविधी हावडा कलकत्ता पश्चिम बंगाल येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील ज्ञानदेव सुखदेव अंभोरे हे सन २००४ मध्ये सैन्य दलात भरती झालेले होते. त्यांनी जवळपास २१ वर्षे सैन्यदलात सेवा केलेली आहे व येत्या एक दोन वर्षात ते निवृत्त होणार होते. सध्या ते कोलकत्ता येथील लष्करी तळावर पायोनियर आर्मी युनिट १८०३ मध्ये हवालदार या पदावर नियुक्तीस होते.

दि.१५ जुलै रोजी ते काही दिवसांची सुट्टी घेवून गावी येण्यास निघाले होते. त्यानंतर १६ जुलैला त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला, मात्र त्यांनी दिवसभर फोन उचलला नाही. १७ जुलैला फोन बंद लागला. अनेकदा फोन करूनही संपर्क न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोलकत्ता येथील त्यांच्या युनिटच्या कार्यालयात फोन करून याबाबत माहिती दिली.
सैन्य दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरु करत कुटुंबियांना थेट आठव्या दिवशी २२ जुलैला सायंकाळी त्यांचा मृतदेह कोलकत्त्याजवळ खडकपूर परिसरात रेल्वे मार्गाशेजारी आढळून आला असल्याचे सांगितले. घटनेला सुमारे ८ दिवस उलटून गेल्यानंतर माहिती समजताच नातेवाईकांनी आणि कुटुंबाने कलकत्ता येथे धाव घेतली आहे. या जवानाचा अंत्यविधी हावडा कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे लष्करी इतमामात होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.