जेऊर- भरधाव वेगातील मालट्रकने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेंडी बायपास रोडवरील द्वारकादास श्यामकुमार मॉलसमोर दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. शैलेश मल्हारी झिंजुटें (वय ३८, रा. सोलापूर, हल्ली रा.चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मयताचे नाव आहे.
याबाबत प्रशांत रमाकांत राऊत (वय ४०, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी यांचा मित्र शैलेश मल्हारी झिंजुटें हा यांची बुलेट (क्र. एमएच १३ इएन ४३४०) ने एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौक ते शेंडी बायपास रोडने जात असताना भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (क्र.एमएच ४६ बीएफ ७६२८) त्याच्या बुलेटला जोराची धडक दिली.

या धडकेत शैलेश झिंजूर्टे यांचा जागीच मृत्यू झाला असून, मोटारसायकलचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावर ट्रक सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत घटनेची माहिती घेतली.
या प्रकरणी प्रशांत राऊत यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ट्रकचालक आदिनाथ आधाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करत आहेत.