पाथर्डी- तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यांतील संशयीत आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शिफारस पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुका दंडाधिकारी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
अदखलपात्र गुन्ह्याची दखल घेतल्यास भविष्यातील मोठे गुन्हे घडण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे बांधाची भांडणे, भावकीतील वाद, शेजाऱ्याचा वाद, व्यक्तिगत व्देषातून घडलेल्या घटना यांच्यामुळे होणारे मोठे गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले.

तालुक्यात पाथर्डी-शहर-१५७, करंजी-६८, कासारपिंपळगाव- ५१, खरवंडीकासार-१५६, टाकळीमानूर-९४, तिसगाव-१३६, माणिकदौंडी-८२, मिरी-११०, मोहोजदेवढे-१४ अशा अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद १ जानेवारी २०२५ पासून झालेली आहे. हे सर्व गुन्हे तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. तेथून अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपींच्या नावाने नोटीस काढली जाईल.
ती नोटीस पोलीस संबधितांना बजावतील. त्यानंतर संबधीत आरोपींना तालुका दंडाधिकारी यांच्या समोर हजर केले जाईल, त्यांच्याकडून बॉण्डवर लिहून घेतले जाणार की आम्ही पुन्हा वाद करणार नाहीत. पुन्हा वाद झाला तर बॉण्ड रद्द केला जाणार. यामुळे आरोपींना चांगलीच चपराक बसेल. यातून मोठे वाद टाळता येतील.
पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी ही नवीन पद्धत अवलंबिली आहे. त्यामुळे किरकोळ वादातून मोठे गुन्हे थांबतील. तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यातील सर्वच आरोपींना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्यातही काळजीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक पुजारी यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. कारवाईच्या भितीने अनेकजण पुन्हा पोलिसांच्या वाटेला जाणे नको, अशी मानसिकतेमध्ये गेले आहेत. नोटिसा आल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर येईल. कायद्याचा धाक राहिला तरच गुन्हेगारांवर वचक ठेवता येतो, असे पुजारी म्हणाले.