अहिल्यानगर- शहरातील व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक हिंदू संस्कृती जपत डीजे मुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावेत. यावर्षी पासून नगर शहराबरोबरच सावेडी व केडगाव उपनगर भागातील उत्कृष्ट देखाव्यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती गणेशोत्सव देखावे स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धेची माहिती देण्यासाठी शहरातील व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दादा चौधरी विद्यालयात झाली. यावेळी विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, राजकुमार जोशी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, स्पर्धाप्रमुख रवींद्र बारस्कर, समन्वयक अंकुश गोळे, अशोक गायकवाड, रवींद्र मुळे, संतोष गेनाप्पा आदींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुधीर लांडगे म्हणाले की, येत्या २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. यावर्षीही शहरात व उपनगरांमध्ये उत्कृष्ट देखावा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पहेलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर.
भारतीय क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि सांस्कृतिक भारत, छत्रपती शहाजीराजे आणि अहिल्यानगर यामध्ये भातोडीची लढाई, भारतीय जीवन शैलीतील पर्यावरण मूल्य यात विविध परंपरा उत्सव यातील पर्यावरण महत्त्व आदी १० विषयांना अनुसरून आकर्षक देखावे सादर करून समाज उत्सवाचा समाज प्रबोधनाचा उद्देश साध्य करावा असे आवाहन त्यांनी केले.