जामखेड- तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन विकासासाठी केंद्र सरकारच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीसाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश लाभले असून, स्थानिक स्तरावर पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन ग्रामपंचायत इमारत आणि नागरिक सेवा केंद्र उभारले जाणार
या निधीतून अरणगाव येथे नव्याने ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र (‘सीएससी रूम’) उभारण्यात येणार आहे. सरकारने यासाठी २५ लाख रुपयांची मंजूरी दिली असून, त्यापैकी २० लाख ग्रामपंचायत इमारतीसाठी आणि ५ लाख नागरी सुविधा केंद्रासाठी वापरले जाणार आहेत. या सुविधांमुळे गावकऱ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळण्याचा लाभ होणार आहे.

गावातच डिजिटल सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ
नागरी सुविधा केंद्रामार्फत आधारकार्ड दुरुस्ती, बँकिंग सेवा, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, पेंशन योजनांचा लाभ, पीएम किसान सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना यांसह अनेक केंद्र व राज्यशासकीय सेवांचा लाभ घराजवळच मिळणार आहे. डिजिटल भारत उपक्रमाला चालना देणाऱ्या या सुविधांमुळे ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही.
‘स्मार्ट ग्रामपंचायत’
प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे अरणगावसह इतर ग्रामपंचायतींमध्ये ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ग्रामपंचायत इमारतींचे आधुनिकीकरण, नागरिक केंद्रित सेवा सुविधा आणि डिजिटल व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यभरातील ५०० ग्रामपंचायतींना लाभ या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ५०० निवडक ग्रामपंचायतींना केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून, अरणगाव ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश झाल्याने जामखेड तालुक्याच्या विकासात एक महत्त्वाची भर पडली आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे ग्रामपातळीवर प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.