अहिल्यानगर- शहरातील विविध रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांनी शहराचे दृश्य विद्रूप झाले आहे. अनेक संस्था, व्यावसायिक आस्थापना, तसेच राजकीय मंडळींनी मनपाची अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, बॅनर, फलक लावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य आणि शिस्त बिघडत असल्याने महापालिकेने यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेच्या निर्देशानुसार शहरात परवानगीविना लावण्यात आलेले फलक, फ्लेक्स आणि जाहिरात बॅनर्स यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच राबवलेल्या मोहिमेत मंगळवारी ४० हून अधिक अनधिकृत फलक हटवण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की ही कारवाई एकदाच होऊन थांबणार नाही, तर सातत्याने राबवली जाणार आहे.

महापालिकेने यापूर्वीही अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते आणि दोषींवर दंड आकारण्यात आला होता. न्यायालयीन आदेशानंतर या कारवाईस अधिक बळकटी मिळाली असून, प्रशासन या संदर्भात ठोस भूमिका घेत आहे.
शहरातील कोणतीही संस्था, व्यवसायिक, सामाजिक किंवा राजकीय घटक यांनी जाहिरातीसाठी फलक लावण्यापूर्वी महापालिकेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निश्चित शुल्क भरून योग्य प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अन्यथा विनापरवानगी फलक आढळल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाईसह पोलीस गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.
शहर स्वच्छ, सुशोभित आणि कायद्याचे पालन करणारे ठेवण्यासाठी महापालिकेच्या या मोहिमेस सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक व राजकीय प्रतिनिधींनी सहकार्य करणे गरजेचे आहे. परवानगीशिवाय कोणतेही फलक लावू नयेत, असे आवाहन करत डांगे यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे कुठलाही दिलासा दिला जाणार नाही.