सोनई- शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे शनिचौथरा पहाटे पाच ते सात पर्यंत निःशुल्क खुला करण्यात येणार आहे. या वेळेत भाविकांना शनिमूर्तीवर जलाभिषेक करता येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
श्रावण महिन्यामध्ये परिसरातील भाविक शनिमूर्तीवर जल अर्पण करत असतात. त्यामुळे देवस्थानने यावर्षीही श्रावण महिन्यात परंपरेनुसार शनिचौथरा दोन तास खुला केला आहे. या काळात देवस्थानकडून स्वतंत्र स्नानाची व्यवस्था, जल पात्रांची व्यवस्था व आरोग्य सेवांचे नियोजन करण्यात येणार आहे.

शुक्रवार (दि. २५) जुलै ते २३ ऑगस्टपर्यंत पहाटे पाच ते सात या वेळेत शनिचौथरा सर्वांसाठी खुला करण्यात येणार असून भाविकांना शनि महाराजांची सेवा करता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची गर्दी होणार असल्याने तेलाभिषेक व जल अभिषेक तसेच दर्शन सुलभव्हावे, यासाठी भाविकांनी देवस्थानच्या नियमांचे पालन करून देवस्थान प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.