वाळकी- विनापरवाना मालट्रकमध्ये भंगार साहित्य वाहतूक करणारा मालट्रक नगर तालुका पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत भंगार साहित्य व ट्रक, असा १२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नगर पाथर्डी रोडवरील चांदबीबी महालाकडे जाणाऱ्या रोड जवळील सर्कल जवळ (दि.२२) जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
नगर तालुका पोलीस नगर- पाथर्डी रोडवर गस्त घालत असताना चांदबिबी महालाकडे जाणाऱ्या रोड जवळील सर्कलजवळ एक टाटा कंपनीचा मालट्रक (क्र. एम एच ०८ एच १६६३) उभा असलेला दिसला. पोलिसांनी ट्रकचालकाकडे चौकशी केली असता, ट्रकचालकाकडे मालट्रकमधील भंगार साहित्य व मालट्रकचे मालकी हक्काबाबतचे कोणतेही कागदपत्रे व अथवा पुरावा मिळून आला नाही.

यावरून नगर तालुका पोलिसांनी मालट्रक चालक अजय उत्तरेश्वर मुंडे (वय २१, रा. मुंडेवाडी, पोस्ट वाघे बाभळगाव, ता. केज, जि. बीड) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९ लाख रुपये किमतीचा मालट्रक आणि ३ लाख रुपये किमतीचे भंगारचे साहित्य (त्यात लोखंडी पत्रे व लोखंडाचे विविध प्रकारचे साहित्य, असा १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो. कॉ. विकास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अजय मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.