शिर्डी- साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून श्री साईबाबांची बदनामी व जातीय तेढ निर्माण करणाराव्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी काल बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहुन फिर्याद दाखल केली आहे.
या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी संबंधित व्यक्तीची हि आक्षेपार्ह क्लिप साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना मोबाईलद्वारे पाठवून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणू दिली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. श्री साईबाबांच्या बदनामीचा विषय गंभीरपणे घेत त्यांनी स्वतःच शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

युवराज उर्फ तलवार बाबा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या व्यक्तीने साईबाबांबद्दल इतर प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांची मूर्ती मंदिरातून काढून नाल्यामध्ये टाकून द्या, यासह धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य आणि आवाहन केलेला व्हिडिओ बनवून व्हाट्सअप व सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत, या व्हिडिओमुळे सर्व धर्मियांतील साईबाबांच्या अनेक साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे.
या मुद्यांवर ही फिर्याद करण्यात आली आहे. श्री साईबाबांची बदनामी करणाऱ्या या घटनेमुळे साईभक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे अधिक तपास करीत आहे. युवराज ऊर्फ तलवार बाबा याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी भाविक करीत आहे.
साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची बदनामी करणाऱ्या अशा कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे साई संस्थानने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सनदशीर मार्गाने योग्य तो धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून युवराज उर्फ तलवार बाबा यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे करीत आहे.