Ahilyanagar Police : एलसीबी प्रवेशासाठी सुरु आहेत राजकीय भेटीगाठी ! जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

Published on -

Ahilyanagar Police : अहिल्यानगर पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती होण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चढाओढ असल्याचे दिसत आहे. एलसीबीमध्ये आपलीच नियुक्ती व्हावी, यासाठी यातील एका कर्मचाऱ्याने नातेवाईक असलेल्या आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा आश्रय घेतला आहे,

तर काही कर्मचारी कामगिरीच्या जोरावर आपणच कसे एलसीबीसाठी सक्षम असल्याचे वरीष्ठांना विश्वासात घेऊन सांगत आहेत; परंतु नव्याने दाखल झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. घार्गे यांची कामाची अभ्यासपूर्ण पद्धत बघता पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांची क्षमता तपासूनच ते नियुक्ती देतील, असा आशावाद प्रामाणिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कार्यरत आहे. जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणणे, अवैध व्यवसायांवर आळा घालणे, चोऱ्या दरोडे रोखणे आदी प्रमुख कामे या शाखेच्या माध्यमातून केली जातात; मात्र गेल्या काही वर्षांपासून ही शाखा वादग्रस्त ठरत आहे. गुन्हे उघड करण्याऐवजी गुन्हेगारांबरोबरच संधान साधण्याचे काम एलसीबीचेकर्मचारी करत असल्याचा आरोप होत आहे. काही कर्मचारी यामुळे वादग्रस्त ठरले आहेत.

यापूर्वी एलसीबीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात नियुक्ती करण्यात आली होती. या ठिकाणी त्याचे मन रमत नसल्याने पुन्हा एलसीबी मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एलसीबीत येण्याआधी हा पोलीस कर्मचारी श्रीरामपूरात नियुक्तीस होता. आता पुन्हा त्याला श्रीरामपूरात नियुक्ती देण्यात आली आहे.

परंतु त्याचे पुन्हा मुख्यालयात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांची त्याने भेट घेतल्याची चर्चा आहे. संगमनेर शहरातील एक प्रमुख राजकीय पदाधिकारीत्याचा नातेवाईक असल्याने या नात्याचा फायदा घेऊन दबाव आणत असल्याचीही चर्चा आहे.

एलसीबीमध्ये येण्यासाठी दोन कर्मचारी उत्सुक आहेत. यातील एकावर अधिकाऱ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे दुसरा कर्मचारी त्याच्याविरुद्ध कारस्थाने करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षकांनीही त्याच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसत नाही.

संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका व्यवसायावर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. शहरातील प्रमुख मटका चालकांना अटक करण्यात आली. मटका चालकासोबत एका पोलीस कर्मचाऱ्याचे अर्थपूर्ण संबंध होते; मात्र त्याला न जागता त्याने त्याला अटक केली होती. तेव्हा सर्व काही करूनही मटका चालकाचा घात झाल्याची चर्चा त्यावेळी पोलीस वर्तुळासह शहरात रंगली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!