अहिल्यानगर : नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी डीपीआर सादर झाल्यानंतर मा. खा. डॉ. सुजय विखे समर्थक त्याचे श्रेय घेऊ लागल्यानंतर गेल्या पाच वर्षात रेल्वे बोर्डाकडून या रेल्वेमार्गासाठी का मंजुरी मिळू शकली नाही असा थेट आणि ठसठशीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास कासार यांनी विचारला आहे.
दिलीप भालसिंग व अनिल मोहिते यांनी नुकतेच नगर -पुणे रेल्वेमार्गासाठी मा. खा सुजय विखे यांनी पाठपुरावा केला होता असा दावा केला होता. या दाव्यावर सुहास कासार यांनी ताशेरे ओढत विचारले की जर पाच वर्षे पाठपुरावा झाला असेल तर रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी का मिळाली नाही ? कासार यांच्या मते वास्तविक पाठपुरावा सध्याचे खासदार नीलेश लंके यांनी केल्यानंतरच या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाली, आणि त्याबाबतची माहिती विविध माध्यमे, सोशल मीडियावरही उपलब्ध आहे. पाठपुरावा ज्यांनी केला, श्रेय त्यांचं असायला हवं. उशिराने जाग आलेल्यांनी श्रेय हक्क सांगणे हास्यास्पद आहे असा टोला कासार यांनी भालसिंग व मोहिते यांना लगावला.

नगर-मनमाड रस्त्याचे काम का रखडले होते ?
कासार यांनी मा. खा. डॉ. सुजय विखेंवर देखील थेट आरोप करत सांगितले की, नगर-मनमाड रस्त्याचं काम त्यांच्याच काळात प्रलंबित राहिलं. मात्र ते खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे पुर्णत्वास जात आहे.
अतिवृष्टी झाली त्यावेळी विखे परदेशात होते का ?
कासार पुढे म्हणाले, मे महिन्यात अतिवृष्टीमुळे वाळकी परिसरात मोठं नुकसान झालं. हजारो नागरिक आणि शेतकरी प्रभावित झाले. त्यावेळी मा. खा. डॉ. सुजय विखे परदेशात होते का ? त्याउलट खासदार नीलेश लंके यांनी बाधीत ठिकाणी जाऊन रस्ते, पूल तयार केले, आरोग्य केंद्रातील गाळ स्वतः काढला आणि गरजूंना मदत दिली. वाळकी हे तुमचे स्वतः चे गाव आहे. माजी खासदार सुजय विखे यांच्यामार्फत तुम्ही आपल्या गावातील पूरग्रस्तांना शासनाची मदत का देऊ शकला नाहीत ? असा बोचरा सावलही कासार यांनी केला.
पाच वर्षात वैद्यकीय महाविद्यालय का झाले नाही ?
संसदेमध्ये खा. नीलेश लंके यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी जोरदार मागणी केली. त्यानंतरच नगर जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. या संदर्भातही कासार म्हणाले, डॉ. विखेंच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत ही बाब का मार्गी लागली नाही ? महाविद्यालयाच्या मंजुरीनंतर ते शिर्डी येथे हालविण्याचे षडयंत्र रचले गेले होते. ही बाब खा. लंके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हे षडयंत्र हाणून पाडल्याचे कासार म्हणाले.
विखेंवरील उतराईचा भाग ?
भालसिंग यांच्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाच्या फेरनियुक्तीवरही कासार यांनी टोला लगावला. ही नियुक्ती माजी खासदार डॉ. विखे यांच्या शिफारशीमुळे झाली असावी. त्यामुळे भालसिंग यांचा विखेंवरील उदो-उदो त्यांच्या उतराईचा भाग आहे का असा खोचल सवाल कासार यांनी उपस्थित केला.
जनता सत्य ओळखते
कासार यांनी स्पष्ट सांगितले की, नगर-पुणे रेल्वेमार्गाबाबत खा. लंके यांनी केलेला पाठपुरावा जनतेसमोर आहे. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी जनता सत्य ओळखते. जनतेची दिशाभूल होणार नाही.