अहिल्यानगर : राज्यात १० कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने १० टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यात ग्रामविकास विभागासाठी एकूण १ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महसूल व वनविभागाकडून निश्चित केले आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागामार्फत हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानासाठी वर्ष २०२५ साठी १ कोटी वृक्षलागवड मोहीम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला ४ लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनानचे प्रमाण २१.२५ टक्के आहे. जागतिक तापमान वढ, हवामन आणि ऋतुतील दाहकता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड हाती घेण्यात आली आहे. राज्यात वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

ही मोहीम राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून २०२५ रोजी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा परिषदेला १ कोटीपैकी ४ लाख ७४ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी ४ लाख ९६ हजार ९००, तर पुणे जिल्ह्यासाठी ४ लाख ९६ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नाशिकला सर्वाधिक, त्यानंतर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वात जास्त उद्दिष्ट आहे. भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन त्या भागात वाढ होणाऱ्या स्थानिक प्रजातींची लागवड करावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाच्या २८ जुलै २०२५ च्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्याचे नोडल अधिकारी आहेत. यासाठी अशासकीय संस्थामार्फत रोपे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदांनी त्यांच्या अंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायती मार्फत वृक्षलागवडीची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. वनविभागाकडून ३ लाख विविध रोपे मिळाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी २ लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे.