उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा बँकेस नाबार्डकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा पुरस्कार

Published on -

अहिल्यानगर- नाबार्डच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना नाबार्डने पुरस्कार जाहीर केले.

यामध्ये जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा बँक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) पुणे येथे केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जिल्हा बँक श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा सन २०२३/२४ चा पुरस्कार बँकेचे संचालक अंबादास पिसाळ आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी स्वीकारला.

सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात शासनाच्या विविध योजना ज्यात पीएम जेडीवाय, पीएम मुद्रा, एपीवाय तसेच केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण या महत्त्वाकांक्षी योजनासह अनेक बाबींमध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उत्कृष्ट काम केले. बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, ठेवीदारांसाठी व सहकारी संस्थांसाठी उत्कृष्ट सेवा ही देत आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाबार्डने हा पुरस्कार दऊन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन्मान केला.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले की, जिल्हा बँक ही नेहमीच शेतकरी आणि सहकारी संस्थांना सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करत असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. नाबार्ड ही संस्था देशाची मानाची संस्था असल्याने अशा संस्थेकडून जिल्हा बँकेस पुरस्कार मिळणे हे बँकेच्या दृष्टीने सन्मानाची व अभिमानाची बाब आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील पाच लाखांच्या वर कर्जदार सभासदांकरिता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बँकेच्या स्वनिधीतून राबवत आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी याकरिता आपले संमती आणि घोषणापत्र याचा फॉर्म भरून आपल्या नजिकच्या संबंधीत बँकेच्या शाखा व सोसायटी यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यातील कर्जदार शेतकरी सभासदांनी या योजनेचा लाभ घेण्याबाबत ही आवाहन बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, नाबार्डचे डीएमडी गोवर्धन सिंह रावत, महाराष्ट्राचे सहकार प्रधान सचिव प्रदीप दराडे, राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, एनडीव्ही चेअरमन डॉ. व्ही. श्रीधर, नाबार्डचे सीजीएम रश्मी दराडे, नॅसस्कॉबचे अध्यक्ष के. रवींद्रराव, महाराष्ट्राचे सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर आनस्कर, राज्यातील जिल्हा बँकांचे, विविध सहाकरी संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

देश व राज्यात अहमदनगर जिल्हा बँक अग्रगण्य

सन २०२४/२५ या आर्थिक वर्षाचा विचार केला असता अहमदनगर जिल्हा बँकेचे भाग भांडवल रुपये ३८१ कोटी, निधी रुपये १४४१ कोटी, ठेवी रुपये ९८८६ कोटी, गुंतवणूक रुपये ४७८३ कोटी, दिलेले कर्ज रुपये ६८९६ कोटी, खेळते भांडवल रुपये १३ हजार ४५८ कोटींचे असून बँक सातत्याने नफ्यात असते. बँकेचे नेट एनपीए शुन्य टक्के आहे. ही सर्व परिस्थिती पाहता देशात व राज्यात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अव्वल आणि अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून भक्कम पायावर उभी आहे, असे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!