अहिल्यानगर- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानामुळे (कृत्रीम बुद्धीमत्ता) सर्वच क्षेत्रात क्रांती होत आहे. त्यामुळे आता विद्यार्थी दहावी-बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडतानाही दक्षता घेताना दिसतात. भविष्यातील पाऊले ओळखून विद्यार्थी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये (तंत्रनिकेतन महाविद्यालय) प्रवेश घेताना ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्सला सर्वाधिक पसंती देत आहेत.
‘ईव्ही’ (इलेक्ट्रिक व्हेईकल) वाहनांमुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवरही मुलांच्या उड्या पडत आहेत, अशी माहिती अहिल्यानगर शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए. एम. आगरकर यांनी दिली.

तीन शाखांसह अहिल्यानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन सुरू झाले होते. आता येथे नऊ शाखा झाल्या आहेत. अगदी सुरवातीपासूनच येथे विद्यार्थ्यांचा प्राधान्य क्रम राहिला आहे. येथे दहावीतील गुणांच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरून केंद्रीभूत पद्धतीने निवड केली जाते.
येथे अर्ज करणारे विद्यार्थी अगदी ९८, ९९, शंभर टक्क्यांपर्यंतचे असतात. येथे ८५ टक्के गुणांपर्यंतच सर्व शाखांचे प्रवेश होतात. शासकीय महाविद्यालय असल्याने येथे मोठी स्पर्धा असते. मोठ्या संख्येने मुले-मुली प्राधान्य देतात. येथे सर्व शाखांच्या मिळून ५२० जागा आहेत. त्या पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरतात.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील अभ्यासक्रमांमध्ये आता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा ओढा वरील तीन शाखांकडे राहतो. वरील तीन शाखांमध्ये विद्यार्थ्यांचा बेसीक एआयचा अभ्यास होतो. एआयचे बेसीक यामध्ये आहे. इतरही शाखांना विद्यार्थी प्रवेश घेतात.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग असा क्रम विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी असतो. सध्या इलेक्ट्रिक व्हेईकलला सर्वांकडूनच पसंती दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात पुढील काळात मोठी संधी आहे. त्यामुळे याकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यातही एआय तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते.
महाविद्यालयातूनच होते विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट
येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. येथे नुकतीच शंभर कॉम्प्युटरची एसी लॅब उभारण्यात आली आहे. तिचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो. येथे सहा प्रयोगशाळा आहेत. तसेच मुले-मुली प्रत्येकी १८० जागांची क्षमता असलेले दोन वसतिगृह येथे आहे. त्यांच्याकडून वर्षभराचे दीड हजार रूपये घेतले जातात. येथे नामांकित कंपन्यांच्या मुलाखतींचे आयोजन केले जाते. जागेवरच प्लेसमेंटसाठी नियोजन केले जाते. टाटा, बजाज अॅटो आदी कंपन्या येथे येतात. गेल्या वर्षी ५२० पैकी ३२० मुलांना जागेवरच विविध संस्थांमध्ये नोकरी मिळाली.
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
विषयातील अभ्यासक्रमांमध्ये आता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा ओढा वरील तीन शाखांकडे राहतो. वरील तीन शाखांमध्ये विद्यार्थ्यांचा उन्नती फाउंडेशन, इन्फोन्सिस यांच्या मदतीने सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट तसेच मुलाखतीची कशी तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. वेगवेगळी व्याख्याने येथे आयोजित केली जातात. तसेच क्षेत्र भेट अंतर्गत थेट एखाद्या कंपनीत काम कसे चालते यासाठी विद्यार्थ्यांना पाठविले जाते.
तसेच दुसऱ्या वर्षानंतर १२ आठवडे म्हणजेच तीन महिने थेट एखाद्या कंपनीत कामाचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठविले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना शेवटी मुलाखती वेळी होतो. त्यांना विचारलेल्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे उत्तरे देता येतात. मुलांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी यासाठी महाविद्यालय परिसरात दोन एकरात २५ हजार विविध औषधी झाडांचे रोपण करण्याचे नियोजन वन विभागाच्या मदतीने सुरू आहे.