नेवासा- शहरातील शालेय विद्यार्थिनींना टारगट मुलांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक नेमून ‘हेल्पलाईन’ सुरु करा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अमृता नळकांडे यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा शहर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना टारगट मुले त्रास देत असून हे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच शहरातील बदामबाई गांधी विद्यालयातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे.

तर शाळा सुटल्यानंतर परिसरातील – विद्यार्थिनी बसने घरी जातात. त्यावेळी बस स्थानकावर ह्या टारगट मुलांचा त्रास त्यांना होतो. शाळा व महाविद्यालयांबाहेर – टवाळखोरांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय व बसस्थानक परिसरात पोलिसांनी छेडछाडी विरोधी पथक नेमावे.
तसेच तत्काळ मदतीसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू करावी. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर छेडछाड विरोधी पथकाची स्थापना न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून या टारगट मुलांचा बंदोबस्त करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमृता नळकांडे, डॉ. मनिषा वाघ, गीता पारखे, नीता कडु उपस्थित होत्या.