अहिल्यानगरमध्ये एकच इमारत दाखवून चार काँलेजसाठी मिळवली मंजूरी, तसेच विद्यार्थ्यांचा कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीही लाटली, गुन्हे दाखल करण्याची आरपीआयची मागणी

Published on -

जामखेड- तालुक्यातील एका दाम्पत्याने नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक या चारही कॉलेजसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून कॉलेजला मंजुरी मिळविताना बनावट कागदपत्र, कागदोपत्री कर्मचारी दाखवून शासनाची फसवणूक करून एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळविली.

तसेच विद्यार्थ्यांचा कागदोपत्री प्रवेश दाखवून त्यांची शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रकार चालू असल्याचा आरोप करत संबंधित दाम्पत्यासह सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या संस्थेमार्फत जामखेड तालुक्यातील साकत येथे एकाच इमारतीत एएनएम/जीएनएम, बी.एस्सी नर्सिंग, डी. फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेज चालविले जात असून शासनाच्या व विद्यापीठाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे. कॉलेजसाठी लागणारा कर्मचारी वर्ग हा कागदोपत्री आहे. प्रत्येक कॉलेजसाठी दाखविलेले ‘प्राचार्य’ हे सुद्धा त्यापदासाठी पात्र नाहीत.

त्यामुळे संबंधित विद्यापीठामार्फत सर्व कॉलेजच्या एकाच दिवशी तपासण्या करून कॉलेज व संस्थेचे विश्वस्थ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे तात्काळ इतर कॉलेजला समायोजन करून स्थलांतर करण्यात यावे.

तसेच संबंधित दाम्पत्यासह या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार (दि.११) पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.

या दाम्पत्याने जामखेड येथील एका हॉस्पिटलच्या माध्यमातून शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत देखील करोडो रुपयांचा घोळ केला आहे. या माध्यमातून गोळा केलेल्या पैशातून अवैध संपत्ती घेतली आहे. संबंधितांनी शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच इमारतीत अनेक कॉलेजला मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. यांनी शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण केलेल्या मालमत्ता शासन जमा करण्यात यावी.
सुनील साळवे, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!