Banking News:- एचडीएफसी बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. तुम्ही देखील एचडीएफसी बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली असून तुम्हाला ती माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. एचडीएफसी बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार चेक क्लिअरन्सच्या बाबतीत असलेल्या नियमांमध्ये बदल केलेला आहे .
याबद्दलचीच माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
चेक क्लिअरन्सच्या बाबतीत बदललेला नियम काय?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार 4 ऑक्टोबर 2025 पासून चेक त्याच दिवशी क्लिअर केले जातील. म्हणजेच ज्या दिवशी बँकेत चेक जमा होतो त्यानंतर त्याला क्लियर होण्याकरिता एक ते दोन दिवसांचा वेळ सध्या लागतो. परंतु आता या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार 4 ऑक्टोबर पासून तुम्ही ज्या दिवशी चेक जमा कराल त्याच दिवशी काही तासात तो क्लिअर होणार आहे. या जलद क्लिअरिंग सुविधेमुळे आता बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पुरेसे पैसे असण्याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. नाहीतर चेक बाउन्स होण्याचे प्रमाण वाढू शकते.

ऑगस्ट 2025 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने चेक हाताळणी बाबत एक नवीन घोषणा केली होती व या घोषणेनुसार बॅच क्लिअरिंग पद्धत बदलली जाऊन त्याऐवजी सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट पद्धत सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता चेक क्लियर होण्यासाठी कमीत कमी वेळ लागणार आहे. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार सदर प्रणाली पहिल्या टप्प्यात 4 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल तर दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 असणार आहे.
या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता 4 ऑक्टोबर 2025 पासून दररोज सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत फक्त एकच प्रेझेंटेशन सत्र असणार आहे व या काळात जे चेक प्राप्त होतील ते स्कॅन करून बँकांद्वारे क्लिअरिंग हाऊसकडे सातत्याने पाठवले जातील आणि देय बँक ते चेक त्वरित तपासून पेमेंटची प्रक्रिया करणार आहे. नवीन प्रणालीमुळे आता चेक सेटलमेंटची प्रक्रिया चेक जमा केल्याच्या दिवशीच पूर्ण होणार आहे.