करंजी- तिसगाव सबस्टेशन ते निंबोडी फाट्यापर्यंत अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले लोखंडी पोल तत्काळ हटवण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्याने देताच संबंधित ठेकेदाराने रात्रीतून दोन-तीन पोल काढून घेतले आहे.
तिसगाव येथून कल्याण – निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव सबस्टेशनपासून निंबोडी फाट्यापर्यंत एका खासगी मिलसाठी ११ केव्हीची स्वतंत्र लाईन टाकण्यात आलेली आहे. ही लाईन टाकताना अगदी महामार्गाला चिकटून लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत. या नवीन लाईनसाठी ७० ते८० लोखंडी पोल वापरण्यात आले आहेत. सर्व लोखंडी पोल राष्ट्रीय महामार्गाला खेटून उभे करण्यात आलेले आहेत. लाईन सुरु करण्यापूर्वीच व काही तारा ओढण्यापूर्वीच लोखंडी पोल ठिकठिकाणी झुकले आहेत.

वास्तविक पाहता संबंधित ठेकेदाराने अथवा व्यावसायिकाने विजेचे पोल उभे करताना संबंधित विभागाची परवानगी घेतली आहे का? राष्ट्रीय महामार्गावर किती अंतरावर अशा एक्सप्रेस लाईनचे पोल उभे करणे महत्त्वाचे आहे. याबाबतच्या अटी शर्थीकडे ठेकेदाराने सपशेल डोळेझाक केली असे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणाऱ्या या ११ केव्हीच्या वीज लाईनचे पोल तत्काळ हटवण्यात यावे.
आठ दिवसांत महामार्गालालगत उभे केलेले सर्व पोल हटवण्यात आले नाही तर बुधवार (दि. १६) जुलै रोजी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे यांनी देताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे देखील धाबे दणाणले होते. त्यामुळे ठेकेदाराने अनधिकृतपणे महामार्गालालगत उभे केलेले काही लोखंडी पोल रात्रीतून काढून घेतल्याची चर्चा तिसगावमध्ये रंगली आहे.