अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात एका शेतकऱ्याला रस्त्यावर थांबवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटणाऱ्या बज्या उर्फ शिवराज हरिश्चंद्र मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) याला अखेर पाथर्डी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, पोपट तुकाराम तांदळे (वय ३२, रा. इंदिरानगर, पाडळी, ता. पाथर्डी) हे घरकुलाच्या कामासाठी सिमेंट आणण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाडळी येथून ५० हजार रुपये रोख रक्कम घेऊन तिसगावकडे निघाले होते.

कासार पिंपळगाव फाट्यावर वाहनाची वाट पाहत असताना त्यांना ओळखीचा बज्या उर्फ शिवराज मरकड आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार नंबर नसलेल्या मोटारसायकलवरून आले. शिवराज मरकड याने त्यांना तिसगाव येथे सोडतो, असे सांगितल्याने ते मोटारसायकलवर बसले. मात्र, तिसगावकडे न नेत मरकड याने गाडी थेट निवडुंगे शिवाराकडे वळवली.
तांदळे यांनी याबाबत विचारणा केली असता, मरकड याने वडील कारखान्यावर असल्याचे सांगून दिशाभूल केली. सायंकाळी साडेसहा वाजता निवडुंगे शिवारात मोटारसायकल थांबवून तिघांनी तांदळे यांना खाली उतरवले. त्यातील एका अनोळखी इसमाने खिशातून चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावला. त्यानंतर बज्या मरकड आणि दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पँटच्या खिशातील ५० हजार रुपये आणि शर्टच्या खिशातील सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला.
आरोपी गाडीवर बसून पाथर्डीकडे पसार झाले. बज्या मरकड याची परिसरात दहशत असल्यामुळे तांदळे यांनी भीतीपोटी तत्काळ पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र, २४ जुलै रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्यांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: बज्या मरकड याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मोबाईल व काही रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
करंजी घाट परिसरात रस्ता लुटीच्या घटना यापूर्वी घडलेल्या असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. बज्या मरकड याच्या अटकेनंतर आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे इतर दोन साथीदार अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.