अहिल्यानगर : शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मेसेसद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. सदर आरोपी मूळचा बीड जिल्ह्यातील असून, तो ट्रक चालक असल्याचे समोर आले आहे.अनिस महंमद हनिफ शेख असे त्याचे नाव आहे.
दि. २ जुलै रोजी सुहास साहेबराव शिरसाठ (रा. बुरूडगाव रोड, अहिल्यानगर) यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आमदार संग्राम जगताप याना दोन दिवसांत जीवे ठार मारू अशी मेसेज आला. त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार आहेर यांनी पथक नेमून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरील गुन्हा अनिस शेख याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो धग्गी, ता. जि. निजामाबाद, तेलंगणा राज्यात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन अनिस शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबद्दल विचारपूस केली असता त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली आहे.