भगवान गड एक धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आता एका नव्या ओळखीने सर्वांच्या नजरेत भरू लागलं आहे. इथं नुकतीच १०० वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, त्यामुळे गडावरचं वातावरण आणखीनच प्रसन्न आणि शांततामय होणार आहे.
वडाचं झाड म्हणजे आपल्या संस्कृतीत पूज्य, छायादार आणि दीर्घायुषी वृक्ष. अशा १०० झाडांनी सजलेला गड आता ‘सर्वाधिक वडवृक्ष असलेलं देवस्थान’ म्हणून ओळखला जाईल, अशी भावना महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केली.

ही विशेष वृक्षलागवड जय हिंद फाउंडेशनच्या पुढाकाराने पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर करण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श सरपंच भास्करराव पेरे, भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज जायभाये, स्वामी महाराज, पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, सुदर्शन महाराज शास्त्री, नगरसेवक रामदास आंधळे यांच्या हस्ते या पवित्र कार्याचा आरंभ झाला.
गडावरील परिसर आधीच भक्तांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. आता या वडाच्या झाडांमुळे तिथं जणू निसर्गाची कृपा अधिकच होणार आहे. पावसाळ्याच्या या सुंदर दिवसांत रोपांची लागवड करून, पुढील अनेक पिढ्यांसाठी सावली आणि शुद्ध हवा देणाऱ्या झाडांचा पाया इथे घालण्यात आला आहे.
या प्रसंगी शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संभाजी शिरसाठ, पप्पू ढाकणे, म्हातारदेव नेहरकर, गोरक्ष पालवे, ईश्वर पालवे, शर्माभाऊ पालवे, सरपंच राजू नेटके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल रामदास शिरसाठ, बबन मंचरे, वनरक्षक विजय पालवे यांचीही उपस्थिती लाभली.
गडावर उगम पावलेली ही १०० वडांची हिरवी रांग, एक नवा अध्याय लिहिणार आहे जिथं श्रद्धा, सेवा आणि निसर्ग प्रेमाचा संगम घडतो आहे. हे झाडं फक्त मुळे धरतील इतकंच नव्हे, तर लोकांच्या मनातही श्रद्धेच्या नव्या मुळांची रुजवण करतील.