पाथर्डी- खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, मुलीस फुस लावून पळवून नेणे, विनयभंग करणे, फसवणूक करणे व मोक्का (संघटित गुन्हेगारी) असे नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला विकी पोपट भोसले, (रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), या सराईत गुन्हेगाराला पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व सहकाऱ्यांनी अटक केली आहे.
पाथर्डी पोलिसांचे या कामगिरीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विकी पोपट भोसले याच्या विरुध्द पाथर्डी पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेवगाव, अहिल्यानगर एमआयडीसी व पुणे येथील सांगवी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण नऊ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

विकी भोसले हा पाथर्डी पोलिसांना अक्षय राजेंद्र जायभाये व त्याच्या मित्राला रस्ता अडवून सोन्याची चेन हिसकावल्याच्या गुन्ह्यात हवा होता. पोलिस त्याच्या मागावर होते. विकी त्याच्या घरी जवखेडे येथील कासारवाडीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अभयसिंह लबडे, अक्षयकुमार वडते, कानिफनाथ गोफणे यांनी सापळा लावला.
पोलिसांची चाहुल लागताच विकी भोसले पळाला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला अटक केली. विकी भोसले याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, मुलीस फूस लावून पळवून नेणे, विनयभंग, फसवणूक करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर दुखापत करणे, व मोक्का (संघटीत गुन्हेगारी), असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पाथर्डीत सहा, शेवगाव, अहिल्यानगर एमआयडीसी व पुणे येथील सांगवी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक, असे एकूण नऊ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संघटित गुन्हेगारी करणारा हा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याचे दोन साथीदार अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुंगा) व लखन बाबासाहेब कासार (रा. कासारवाडी) यांनी व विकी भोसले याने २४ जुलै २०२५ रोजी रात्री पावणेबारा वाजता अक्षय जायभाये व त्याचा मित्र शिवम भारत आठरे यांच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. त्यांना रस्त्यावर पाडून त्यांना मारहाण करूनन गंभीर जखमी केली.
त्यांची तीन तोळ्याची सोन्याची चेन व खिशातील ७५०० रुपये लुबाडले होते. या गुन्ह्यात विकी भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. लखन कासार व अक्षय मरकड यांचा पोलिस शोध घेत आहेत. विकीच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघड होतात का, याचा तपास पोलिस करीत आहेत.