ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच आमदार रोहित पवारांनी राशीनची घटना घडवली, भाजपचा आरोप

Published on -

कर्जत- गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना राशीन जिल्हा परिषद गटातुन अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही म्हणून ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच राशीनची घटना घडवली. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी केला.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील घटने संदर्भात कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गदादे यांनी स्पष्ट केले की, राशीन येथील करमाळा चौकाला दहा वर्षांपूर्वीच राशिन ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने ठराव घेऊन महात्मा ज्योतीराव फुले चौक असे नामकरण करण्यात आले आहे.

मात्र दि.१३ जुलै २०२५ रोजी राशीन येथील महात्मा ज्योतीराव फुले चौकात रात्री सकल मराठा बांधवांनी भगवा ध्वज लावला. यावेळी घडलेल्या घटनेवेळी सकल मराठा बांधवांवर लाठीमार झाला, काही विघ्नसंतोषीमुळे हे घडले तसेच या चौकाचे नामकरण करण्यात येणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे सकल ओबीसी समाजाने कर्जत येथे रास्ता रोको आंदोलन केले.

सकल मराठा व ओबीसी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जत तालुक्यातील सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे, मात्र काही विघ्नसंतोषीमुळे याला राजकीय वळण मिळाले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हा प्रश्न येथे एकत्र बसुन मिटविण्याऐवजी थेट विधानसभेत उपस्थित केला.

कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पवार यांना राशीन जिल्हा परिषद गटातुन अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. यामुळे दुरावलेल्या ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच हे कारस्थान आमदार रोहित पवार यांनीच केले असा आरोप अनिल गदादे यांनी केला. दोन्ही समाजात वाद नाहीत मग ही घटना घडलीच कशी, राशिन येथील घटनेबाबत आमदार पवार यांनी आत्मपरीक्षण करावे. तालुक्यातील विविध समाजात मनभेद निर्माण करु नयेत असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी केले.

यावेळी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, बाजार समितीचे संचालक नंदकुमार नवले, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, कर्जत तालुका दुध संघाचे संचालक काकासाहेब धांडे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजित अनारसे, राशीन मंडल अध्यक्ष सुनील काळे, राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे, दत्तात्रय गोसावी, पांडुरंग भंडारे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!