शिर्डी- शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानाला मंगळवारी साईबाबा मंदिरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. ई-मेल मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर संस्थान प्रशासन व पोलिसांनी शांतता राखत योग्य तपास केला. चौकशीत ही धमकी खोडसाळपणाची असल्याचे स्पष्ट झाले असून, साईभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या आहेत.
श्रीसाईबाबा संस्थानला मंगळवारी, २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता एक ई-मेल प्राप्त झाला. ज्यामध्ये शिर्डी साई मंदिरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. या मेलमध्ये शिर्डी साई मंदिराच्या खोल्यांमध्ये ४ नायट्रिक इम्प्रोव्हाइज्ड ईडी (स्फोटके) लावण्यात आली असून, ती दुपारी १ वाजता सक्रिय होतील. सर्व भाविक व कर्मचारी बाहेर काढा, असा मजकूर होता. यामुळे प्रथम क्षणी खळबळ उडाली.

सुरुवातीला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थानच्या सुरक्षा विभागाने तत्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही आणि हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी २ मे रोजीही अशाच स्वरूपाचा ई-मेल प्राप्त झाला होता. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, त्या पूर्वीच्या मेलप्रमाणेच याहीवेळी त्या परिसरातील किंवा त्या व्यक्तीकडून, फक्त नाव बदलून, मेल पाठवण्यात आला असावा.
ई-मेल सकाळी आलेला असला तरी कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतर १०.३० वाजता तो निदर्शनास आला. त्यानंतर साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
अहमदनगरहून डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक शिर्डीत दाखल झाले. स्थानिक पोलीस व संस्थानच्या सुरक्षा विभागाने घबराट न माजवता भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसर व भक्त निवासांची सखोल पाहणी केली. तपासणीत कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
प्राथमिक चौकशीनुसार ही धमकी भीती निर्माण करण्याच्या हेतूने दिली गेली असून, ती खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ई-मेल आयडीखाली भगवंत मान ४ हे नाव प्रेषक म्हणून नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिर्डीला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहायक निरीक्षक येसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणी साईसंस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली असून, पोलीस तपास सुरू आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
भाविकांनी घाबरून जावू नये : गाडीलकर या धमकीचा भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही. दर्शन व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. सर्व प्रक्रिया शांततेत व नियमितपणे सुरू होत्या. गुरुवारी सकाळी माध्यमांना यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली. सीईओ गाडीलकर यांनी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.