शेवगाव- तालुक्यातील एरंडगावसह खानापूर परिसरात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जायकवाडी धरणावरील पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढले असून, शनिवार (दि. १९) रोजी मध्यरात्री चोरटे धरणाच्या कडेला असलेल्या पाण्याच्या मोटारी व वायर चोरून नेत असताना वस्तीवरील शेतकरी जागे झाले. यामुळे साडेसात एच.पी. पाण्याची मोटार व वायर रस्त्याच्या कडेला टाकून चोरटे पसार झाले.

तसेच सोमवार (दि. २०) रोजी शेतकरी आसाराम केशव गोबरे यांच्या डाळिंब बागेतील डाळिंब भुरट्या चोरांनी रात्री बाराच्या नंतर तोडून नेले तर काही डाळिंब फळे जागेवर तोडून टाकली. सध्या डाळिंबाला बाजारात प्रति किलो ३०० ते ३५० असा भाव बाजारात मिळत असल्यामुळे चोरटे डाळिंबाची चोरी करत आहेत.
खानापूरसह एरंडगाव परिसरात रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिसरात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त घालणे गरजेचे आहे. अशा भुरट्या चोऱ्या करणाऱ्यावर शेवगाव पोलिसांनी वेळीच कारवाई करावी अन्यथा भविष्यात या भागात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचे मनोबल वाढून त्याचे रूपांतर मोठ्या चोरीत होऊ शकते.
– योगेशराव चेडे पाटील, उपसरपंच, खानापूर.