दारू पिऊन नाही तर दूध पिऊन गटारी अमावस्या साजरी करा, अकोल्यात महिलांचा प्रेरणादायी उपक्रम, आमदाराचाही सहभाग

Published on -

अकोले- गटारी अमावस्या म्हटली की दारूच्या पायर्यांची कल्पना सहजच डोळ्यापुढे येते. मात्र यंदा अकोले तालुक्यात या परंपरेला छेद देत एकल महिलांनी “दारू नको, दूध प्या” या घोषवाक्याखाली गटारीला दारूचा धिक्कार करत समाजप्रबोधनाचा अभिनव उपक्रम राबवला.

अकोले तालुक्यातील एसटी स्टँड परिसरात ‘द दारूचा नव्हे, दुधाचा’ असा फलक लावण्यात आला होता. याच ठिकाणी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर एकल महिलांच्या हस्ते उपस्थितांना दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमाचे प्रास्ताविक करताना हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, दारूप्रश्न व एकल महिलांचा प्रश्न परस्परपूरक आहे. अनेक महिला दारूच्या व्यसनामुळे विधवा झाल्या आहेत. त्यामुळे दारूविरोधी प्रबोधन करण्यासाठी एकल महिला समितीने पुढाकार घेतला आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आषाढ अमावस्या हा प्रकाशाचा दिवस आहे, पण दारूमुळे हा दिवस बदनाम झाला आहे. आता व्यसनालाच बदनाम करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात दारूबंदी होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर लवकरच दारू थांबली नाही, तर १५ ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत,” असा इशाराही त्यांनी दिला.

लिंगदेव येथील दारू दुकाने फोडून दारू पकडून देणाऱ्या महिलांचे आमदार लहामटे व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. कल्पना सोनूले, वैशाली राजगुरू, गीतांजली बंदावणे आणि प्रतिमा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून दारूने कसा संसार उद्ध्वस्त होतो याची व्यथा कथन केली. दीपक महाराज देशमुख यांनी या उपक्रमामागील धार्मिक आणि सामाजिक बाजू स्पष्ट करत व्यसनमुक्त समाजाची गरज अधोरेखित केली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी अकोले तालुक्यात दारूविरोधात निर्माण झालेली आक्रमक जनभावना कौतुकास्पद असल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले.

समारोप डॉ. कडलग यांनी केला आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!