अहिल्यानगर- केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनीविरोधात संतापची लाट आहे. केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता.
आज स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या पंधरा दिवसांत विजेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. आर. राहिंज यांनी दिल्याची माहिती कोतकर यांनी दिली.

स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर म्हणाले की, विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे होते मात्र, कुठल्याही उपाययोजना न झाल्यामुळे लाईट वारंवार जात असल्याने दोन दोन दिवस केडगाव अंधारात राहत आहे. आता महावितरण प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून एकाच दिवशी संपूर्ण कामे मार्गी लावणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी बरेच दिवस वाट पहावी लागते.
त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी मनोज कोतकर यांनी केल्यानंतर केडगाव उपनगराचे दोन भागात विभागणी केली जाणार असल्यामुळे कर्मचारी देखील वाढवून दिले जाणार असल्याचे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकाळत असून नवीन खांब सबविण्याचे आश्वासन दिले.
तसेच, गरज असेल तिथे डीपीचे नियोजन केले जाईल. महावितरण कार्यालयाचा दूरध्वनी कायम बंद असल्याबाबत विचारणा केली असता कर्मचारी संख्या अपुरी असून लवकरच केडगाव उपनगरासाठी जास्तीत जास्त कर्मचारी दिले जाणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी सहायक अभियंता राहुल शिलावत व कर्मचारी उपस्थित होते.
दौंड रस्ता परिसरात शहरी भागाला जोडावा: कोतकर
दौंड रस्त्यावरील विद्यानगर, हनुमाननगर, इंदिरानगर, कायनेटिक चौक या परिसराचा विद्युत पुरवठा ग्रामीण भागाला जोडला असल्यामुळे लाईट वारंवार जात असून ओव्हरलोडचा प्रश्न निर्माण होत आहे. सातत्याने लाईट जात असल्यामुळे घरातील विजेवर असणारी उपकरणे जळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी हा विद्युत पुरवठा शहरी भागाला जोडला जावा आणि या परिसराला पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याचे आवाहन
या बैठकीत मनोज कोतकर यांनी नागरिकांना लाईट बिल जास्त येत असल्याने स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला आहे. त्यावर अधिकारी म्हणाले, नागरिकांनी स्मार्ट मीटर बसून घेतल्यास सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत एका युनिट मागे ८० पैसे कमी केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना लाईट बिल देखील कमी येणार आहे. रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा येणारा खर्च कमी होणार आहे तरी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.