वकिल्यांच्या खोट्या नोटीसी अन् धमकीच्या फोनने अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक हैराण, सावधानता बाळगण्याचे आवाहन

Published on -

अहिल्यानगर- अनेक नागरिकांना कोणतेही कर्ज किंवा फायनान्स न घेतल्यासुद्धा वकिलांच्या नावाने ऑनलाईन नोटिसा आणि पैसे भरण्याबाबत धमकीचे फोन येत असल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र बनली असून, शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या तरुण-तरुणींना कारणीभूत ठरवत, त्यांच्या पालकांना आर्थिक देणी चुकवल्याचा बनावट दावा करून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत.

सोशल मीडियावर बोगस नोटिसांचा सुळसुळाट

ही टोळी इतकी धाडसी झाली आहे की, मुला-मुलींच्या नावे फायनान्स घेतल्याचे भासवत त्यांच्या पालकांकडे प्रत्यक्ष जाऊन पैसे मागितले जातात. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता वकिलांच्या नावाने बोगस नोटिसा पाठवल्या जात असून, या नोटिसा स्टॅम्प पेपरवर असल्याने अनेक भोळसुधा नागरिक त्याला बळी पडतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नोटिसा पाठवणे, फोनवर दमदाटी करणे आणि कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून पैसे वसूल करणे हे या टोळक्याचे ठरलेले तंत्र झाले आहे.

सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या

राज्यभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, मुंबईमध्ये सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१५ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ५४,८०९ सायबर गुन्हे दाखल झाले. यातील केवळ १५,१४५ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित ३९,६६४ आरोपी अद्याप मोकाट आहेत.

फसवणुकीचे विविध प्रकार

सायबर गुन्ह्यांचे स्वरूप वेगवेगळे असून त्यामध्ये क्रेडिट कार्ड फसवणूक, बँक खाते हॅक करणे, ऑनलाईन खरेदीतील फसवणूक, समाजमाध्यमांवरून धमकी देणे, वेबसाईट हॅकिंग, संगणक प्रणालीत घुसखोरी करणे आणि अश्लील साहित्य प्रसारित करणे यांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये नागरिकांनी कुठलीही माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नये आणि आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगावी.

सायबर फसवणूक झाली तर काय कराल?

सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (https://cybercrime.gov.in) वर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. याशिवाय, सायबर आर्थिक फसवणुकीच्या तात्काळ तक्रारीसाठी १९३० हा टोल-फ्री क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. तातडीने संपर्क साधल्यास व्यवहार थांबवणे किंवा पैसे परत मिळवणे शक्य होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!