श्रीगोंदा- शहरातील रविवार पेठेतील भरवस्तीत असलेल्या परवानाधारक दारूच्या दुकानामुळे परिसरात दारुड्यांकडून परिसरातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप होत असल्याने दारूच्या दुकानाचे स्थलांतर करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सतिष बोरुडे यांच्यासह नागरिकांकडून अहिल्यानगर येथील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांनी सदर वाईन्स दुकान पाच ते सहा महिन्यांमध्ये स्थलांतरित होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार ग्रामस्थ गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात आक्रमक होते. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी भरारी पथकांना सदर परिसरात कारवाई करण्याचे तात्काळ आदेश दिले.
श्रीगोंदा शहरातील दैवत राष्ट्रसंत शेख महंमद बाबा यांच्या परिसरात मागील ४० वर्षांपासून हे दारूचे दुकान सुरू आहे. मुख्य बाजार पेठेत असल्याने या वाईन शॉपच्या आजूबाजूला अनेक अवैध दारू विक्रेते तयार झाले असल्याने परिसरात मद्यपींचा कायम वावर असल्याने परिसरातील नागरिकांना, शाळकरी विद्यार्थी, महिला यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
त्याचसोबत वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील अवैध दारू विक्रीमुळे दारुड्यामधे मोठ्या प्रमाणात शिवीगाळ, भांडण हाणामाऱ्या होणे हे नित्याचे झाले असून याचा या भागातील नागरिकांना सहन करावे लागत असल्याने प्रमोद सोनवणे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेश आण्णा सुडके सतीश बोरुडे संदीप कुणगर आजिनाथ मोतेकर सोमनाथ गोडसे अल्ताफ शेख भाऊ माने रामदास शिंदे इत्यादी उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी सत्यम वाईन्स हे दारूचे दुकान रविवार पेठेतून दुसरीकडे शिफ्ट करू असे लेखी आश्वासन दिले असल्याने आजचे आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र हे दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या दालनात आंदोलन करणार.
– टिळक भोस, सामाजिक कार्यकर्ते