शिर्डी- शिर्डी शहरातील कनकुरी रोड परिसरात फुटपाथवर उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी नगरसेविका वैशालीताई गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.
माजी नगरसेविका वैशालीताई वेणूनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांना निवेदन सादर केले. त्यात नमूद करण्यात आले आहे की, श्रीरामनगर परिसरातील महिलांना व विद्यार्थ्यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

फुटपाथवर वाहनांची गर्दी असल्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. यामुळे अनेक वेळा शाळांची वाहतूकही अडथळ्याच्या सापळ्यात अडकते. फुटपाथवरील मनमानी वाहनांमुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला रिक्षा व दुचाकी उभ्या केल्याने महिलांना चालताना त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू असल्यामुळे काही टोळक्यांकडून महिलांच्या बाबतीत अश्लील भाषेचा वापर केला जातो, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री अकरा वाजेनंतर सर्व दुकाने सक्तीने बंद करण्यात यावीत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. महिला शिष्टमंडळाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिले गेले नाही, तर त्यांना नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
या निवेदनप्रसंगी रवीना रहाणे, मुक्ताबाई जाधव, चंद्रकला गीते, संगीता गागरे, भारती बोथेले, दुर्गा बोथेले, मीना कुरकुटे, शीतल तळेकर, विजया गीते, सुनीता म्हस्के, कल्पना म्हस्के, भगवती आहेर, मनीषा जाधव, सुलभा धनवटे, शोभा आहेर, संगीता गोंदकर, पूजा गोंदकर, सुरेखा कांदळकर, लता उदावंत, सुनीता गायकवाड, श्रावणी म्हस्के, दिपाली म्हस्के, अश्विनी गीते, निकिता मस्के, प्रिया मस्के, मीना पवार आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.