अहिल्यानगर : राहाता तालुक्यात बिबट्याने अनेक मुले व प्राण्यांचे बळी घेतले आहे. तसेच प्राणघातक हल्ले करून मोठी दहशत निर्माण केलेली असतानाच आता राहाता परिसरात सिंहाचा वावर वाढल्याने आता बिबट्या व सिंह यांच्या दुहेरी दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर व नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. राहाता शहरातील सदाफळ वस्तीवर सिंह दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने तातडीने संबंधित ठिकाणी पिंजरा लावून सिंह व बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर सिंह या भागात फिरू शकत नाही. सिंह जंगलातच राहतो, असे म्हणून तो सिंह होता की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रित केलेला सोशल मीडियावर फिरवून तेथे सिंहच असल्याचा दावा केला आहे.

राहाता तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बिबटे मोठा धुमाकूळ घालत आहे. दररोज कुठे ना कुठे पशुधनावर डल्ला मारत आहेत. कुठे नागरिकांवर हल्ले करताहेत तर यापूर्वी अनेक चिमुकल्यांना बिबट्याने आपली शिखर बनवले आहे. त्यात आता सिंहाची भर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सदाफळ वस्ती मावलाया रोड या भागात एका रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत काही मजुरांना सिंह दिसून आला आहे.
त्यांनी तो प्रसंग मोबाईलमध्ये कैद केल्या असल्याचे बोलले जाते. खरोखर तो सिंह होता की नाही याची पडताळणी होणे कामी वनविभागाने गांभीर्याने घेऊन आपल्या कार्यपद्धतीनुसार तो बिबट्या की सिंह याचा शोध घेऊन तसेच संबंधित प्राण्याला जेरबंद करून नागरिकांना सुटकेचा नि:श्वास द्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, बिबट्या पाठोपाठ आता सिंहाचे दर्शन होऊ लागल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे.
शेतकरी व शेतमजूर आपल्या शेतात जाताना जीव मुठीत धरून जात आहे. बिबट्या व सिंहाच्या दहशतीखाली नागरिक जीवन जगत आहे. सिंह या भागात आला कुठून व कसा हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने भेडसावत आहे. नागरिकांनी वन विभागाने याबाबत सत्यता सांगितल्या नंतरच यावर विश्वास ठेवावा, अशी चर्चा सुद्धा सुज्ञ नागरिकांमध्ये आहे.