अहिल्यानगरमधील आयुष रुग्णालयातील मेडिकलवाल्याचा खोडसाळपणा, रुग्णाला जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याची तक्रार

Published on -

अहिल्यानगर- शहरातील आयुष रुग्णालयात औषधनिर्मात्याने जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याचा गंभीर आरोप श्रीगोंदा तालुक्यातील भापकरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भैरुशंकर भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे दाखल केली आहे. चुकीचे औषध देण्याचा प्रकार गंभीर असून, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. घोगरे यांनी दिले आहे.

भैरुशंकर भापकर हे कफ, खोकला आणि पित्ताच्या तक्रारींसाठी सोमवारी अहिल्यानगर येथील आयुष रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून केस पेपरवर मुखावाटे घ्यावयाचे आयुर्वेदिक औषध लिहून दिले. त्यानुसार भापकर यांनी रुग्णालयातील औषध भांडारातून औषध घेतले. मात्र, घेतलेले औषध डॉक्टरांना दाखवले असता, डॉक्टरांनी हे औषध आपण लिहून दिलेले नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे भापकर यांनी पुन्हा औषध भांडारात जाऊन याबाबत विचारणा केली, परंतु तेथील औषधनिर्मात्याने सर्व औषधे बरोबर असल्याचा दावा करत ती मुखावाटे घेण्याचा सल्ला दिला.

भापकर यांच्या मते, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी औषधनिर्मात्याने अंगाला चोळण्याचा लेप दिला आणि तोच मुखावाटे घेण्याचा चुकीचा सल्ला दिला. भापकर यांनी असा आरोप केला आहे की, यापूर्वीच्या काही तक्रारींमुळे औषधनिर्मात्याने रागाच्या भरात जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिले. हा प्रकार केवळ गंभीर चूक नसून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न असल्याचे भापकर यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे त्यांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, भैरुशंकर भापकर यांची तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी तातडीने चौकशी सुरू करण्यात येईल. चुकीचे औषध देणे ही अत्यंत गंभीर बाब असून, जर यात कोणाची चूक आढळली तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!