शहरातील दिल्ली नाका परिसरात उभारलेल्या पोलिस चौकीत अंधाराचे साम्राज्य, वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी

Published on -

संगमनेर- मोठ्या प्रयत्नानंतर शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दिल्ली नाका परिसरात सुरू करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज उपलब्ध नसल्याने या चौकीमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे या चौकीला वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हाणामाऱ्यांच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. आमदार अमोल खताळ यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी नवीन पोलीस चौकी सुरू केली आहे.

या पोलीस चौकीमध्ये दोन ते तीन कर्मचारी थांबतात. गेल्या काही दिवसांपासून या पोलीस चौकीमध्ये वीजपुरवठा नसल्याने रात्री ही पोलीस चौकी अंधारलेली असते. त्यामुळे पोलीस कर्मचारी रात्रीच्यावेळी या ठिकाणी अनुपस्थित असतात.

शहरातील अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील परिसरामध्ये ही चौकी असतानाही या चौकीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेर शहरांमध्ये तातडीने ही पोलीस चौकी सुरू केली आहे. या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा उपलब्ध नाही.

पोलीस चौकीत अंधार असल्याने या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी विजेची त्वरित व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, या परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प चार्ज होत नसल्याने या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!