Ahilyanagar News : सुपा पोलिसांच्या ताब्यातील संशयास्पदरीत्या मृत्यू पावलेल्या परप्रांतीय तरूणाच्या मृत्यूचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हितेशकुमार रवीश्वर प्रसाद (वय २६,पनवेल,नवी मुंबई,मूळ राहणार उत्तर प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.हितेशकुमारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात केले असून,शवविच्छेदन अहवाल मिळताच गुन्हा दाखल करणार. अशी माहिती सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी,सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

दि.२२ जुलैला रात्री अहिल्यानगर – पुणे मार्गावरील पवारवाडी येथील अंबिका कला केंद्राच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या सिमेंट पाईप कारखान्याच्या आवारात पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला.यावेळी हितेशकुमार प्रसाद हा त्याच्याकडील पीकअप वाहनाजवळ (क्रमांक एमएच २० ईजी २३३५) थांबला होता.कारखान्यात अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केल्याचे व त्यांनी तेथील लाईट बंद केल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील तरूण कारखान्याकडे धावले.
त्यावेळी हितेशकुमारने पीकअप घेऊन तेथून पुण्याच्या दिशेने पळाला. मात्र त्यास टोलनाक्यावर अडवण्यात आले व तरुणांनी बेदम मारहाण केली.हा प्रकार सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी हितेशकुमारला ताब्यात घेतले व ठाण्यात आणले. त्यानंतर ते सिमेंट पाईप कारखान्याकडे गेले.तेथे त्यांनी हितेशकुमारच्या साथीदारांचा शोध घेतला.मात्र तोपर्यंत ते पसार झाले होते. दरम्यान,बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात बसवून ठेवलेला हितेशकुमारला अत्यवस्थ झाला.
त्याला पोलिसांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच तो मृत्यू पावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मात्र ताब्यात घेतलेल्या आरोपीची तातडीने वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना तशी ती केली नसल्याने हितेशकुमारच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. सिमेंट पाईपच्या कारखान्यात यापूर्वी दोन,तीन वेळा चोरीच्या घटना व चोरीचा प्रयत्न झाला होता. मंगळवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने हितेशकुमार व त्याचे इतर साथीदारांनी सिमेंट कारखान्यात प्रवेश केला असावा असा संशय सहायक पोलिस निरीक्षक दिवटे यांनी व्यक्त केला.