श्रावण मासानिमित्त गोदावरी नदी काठी स्नान करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची मागणी

Published on -

कोपरगाव- श्रावण मासानिमित्त महिला मोठ्या संख्येने स्नानासाठी येतात. गोदावरी नदीच्या काठी महिलांसाठी स्नानाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिकेने ती व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेला काल देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, श्रावण मासात अनेक महिला येथील गोदावरी नदीत स्नान करणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानतात. गोदावरी नदीच्या काठी स्नानाला येणाऱ्या महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना असणे आवश्यक आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यांना स्वच्छतेच्या दृष्टीनेही सोयीचे होईल. घाटावरील सुरक्षा कठडे तातडीने दुरुस्त करणे, कपडे बदलण्यासाठी छत असलेली जागा, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशा सोयी उपलब्ध करून दिल्यास, महिलांना नदीत स्नान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहील.

प्रत्येक श्रावणी सोमवारी होणाऱ्या गंगा-गोदावरी महाआरतीस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. परंतु, गोदा घाटावरील लोखंडी सुरक्षा कठडे मोडकळीस आलेले असून त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे कठडे तातडीने दुरुस्त करावे. येत्या कुंभमेळ्याच्यादृष्टीने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन सेवा यांचा समावेश असलेली भक्कम दीर्घकालीन व्यवस्था पालिकेने करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तात्पुरत्या प्रतिष्ठानकडून स्वरूपात एक महिन्यासाठी असे कक्ष उभारण्यास नगरपालिकेची परवानगी मागण्यात आली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलेले आहे. नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावतीने हे निवेदन कार्यालयीन अधीक्षक कविता सोनवणे यांनी स्वीकारले. यावेळी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!