संगमनेर- केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आज देशभरातील कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. संगमनेरातील काही संघटनाही या संपात सहभागी झाल्या आहे. काल बुधवारी सकाळी तंबाखू कामगार युनियनसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरेस्ट वाहतुकदार संघटना, भारतीय किसान सभा व आशा वर्कस आदी संघटनांनी येथे आंदोलन करीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विशेष जनसुरक्षा विधेयक व कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासह राज्य विमा योजनेशी जोडलेल्या सात हजारांहून अधिक लाभार्थ्यांची परवड थांबवण्यासाठी संगमनेरात करार बद्ध संलग्न रुग्णालय सुरु करण्याची प्रमुख मागणी निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांना कामगारविरोधी ठरवत देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज देशभरात संप पुकारला आहे.

संगमनेरातही लाल बाव्हट्याच्या छायेखाली कार्यरत असलेल्या तंबाखू कामगार युनियनसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरेस्ट वाहतुकदार संघटना, भारतीय किसान सभा व आशा वर्कस आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य कामगारांनी काल मोर्चाने संगमनेरच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली.
यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. प्रमुख कामगार नेत्यांनी नायब तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले. या निवेदनात विशेष जनसुरक्षा विधेयकासह २०२० च्या चार कामगारविरोधी कायद्यांना रद्द करण्याची
मागणी केली गेली आहे.
२१ हजार रुपयांच्या आत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वरदान असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिक अथवा अहिल्यानगरला हेलपाटे मारावे लागत असल्याने लाभार्थ्यांची परवड होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यावेळी वरील सर्व कामगार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित झालेल्या संगमनेरात अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय असून सात हजारांहून अधिक कामगार त्यात काम करतात. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेचा लाभकर्मचाऱ्यांना मिळतो.
मात्र, त्यासाठी नाशिक अथवा अहिल्यानगरला जावे लागत असल्याने लाभार्थी रुग्णासह त्याच्या नातेवाईकांची मोठी परवड होते. त्यामुळे सदर योजनेशी करारबद्ध केलेले संलग्न रुग्णालय संगमनेरात सुरु व्हावे, अशी वारंवार मागणी होते. त्यासाठी कालही आग्रह करण्यात आला आहे.