AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आगरकर मळा परिसरामध्ये डेंगू मुक्त अभियान संपन्न

नगरकरांनी मनपाच्या आरोग्य केंद्रावर जाऊन मोफत रक्त लघवी तपासणी करून घ्यावी - आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Published on -

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी तसेच डेंग्यू व पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागामार्फत मागील वर्षापासून डेंग्यूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले असल्याने नगरकरांमध्ये जनजागृती झाली आहे, शहरात दीड लाख लोक वस्ती असून मनपा कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही तरी नागरिकांनी आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम राबवावी,

शहरामध्ये वीस आठवडे डेंगू मुक्त अभियान सुरू राहणार असून आज पर्यंत ६ आठवडे झाले आहे यामध्ये ३५० घरामधील पाणीसाठ्यामध्ये डेंग्यू सदृश्य अळ्या सापडल्या असून ५५० पाणीसाठे नष्ट केले आहे महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी आतापर्यंत ७ हजार घरांना भेट देत नागरिकांची तपासणी करून औषध उपचार केले आहे तरी नगरकरांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर जाऊन मोफत रक्त लघवी तपासणी करून घ्यावी डेंग्यू हा आजार कमी रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला होवू शकतो, हा आजार दिसतो तसा नसून जीव घेणारा आहे, तरी सर्व नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आगरकर मळा परिसरामध्ये डेंगू मुक्त अभियान राबविले जात आहे. त्यानुसार आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी स्टेशन रोड भागातील आगरकर मळा परिसरात संपन्न झाले, यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर शीलाताई शिंदे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, माजी नगरसेवक दीपक खैरे, विजय गव्हाळे, प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के डी खानदेशे, आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर, सृष्टी बनसोडे, सुरेखा विधाते, बूथ हॉस्पिटल प्रशासन अधिकारी मेजर उषा गायकवाड, डॉ,सृष्टी बनसोडे, विकास गीते, आदी उपस्थित होते

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी उपाययोजना करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी असून ती जबाबदारी आयुक्त यशवंत डांगे व त्यांचे सहकारी यशस्वीपणे पार पाडीत आहेत. नागरिकांनी देखील आपले सामाजिक दायित्व ओळखून यात सहभागी व्हावे आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एक तास वेळ द्यावा. आपले शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे के.डी खानदेशे म्हणाले की महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे शासनाच्या विविध योजना शहरात प्रभावीपणे राबवित आहेत स्वतः फिल्डवर उतरून नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता मोहीम डेंग्यूमुक्ती अभियान आदी राबवीत आहेत. त्यामुळेच आज शहरात डेंग्यू तसेच संसर्गजन्य आजार नियंत्रणात असल्याचे दिसून येते. डांगे यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचे स्मरण होते. ते सुद्धा अशाच प्रकारे नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधून समस्या सोडवत होते असेही खानदेशी यावेळी म्हणाले

यावेळी माजी महापौर शिलाताई शिंदे म्हणाल्या की, महापौर पदाच्या कालखंडात महापालिका प्रशासनाचे कामकाज मी जवळून अनुभवले आहे नागरिकांच्या सहकार्याशिवाय शासनाचे कोणतेच अभियान यशस्वी होऊ शकत नाही. डेंगू मुक्ती अभियान हे थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजारा पासून दूर राहण्यासाठी महापालिका प्रशासन आरोग्य विभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे त्या म्हणाल्या

यावेळी महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्राच्या वतीने आशा सेविकांच्या माध्यमातून डेंग्यूमुक्ती जनजागृती करीता डेंग्यू चा हल्ला व त्यावर मात या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. बुथ हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य असलेल्या फलकांद्वारे जनजागृती केली.

चौकट : महापालिका हद्दीमध्ये 20 आठवडे मुक्ती अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. डेंग्यूची अथवा तत्सम आजारपणाची लक्षणे जाणवताच नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा. प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्याच्या दृष्टीने संतुलित आहार घ्यावा असे आवाहन यावेळी आयुक्त डांगे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!