राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

Published on -

राहुरी- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात कृषी व सहकार क्षेत्रातील योजनांची माहिती देताना त्यांनी राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्याचे स्पष्ट आश्वासन दिले. या भाषणातून शेतकऱ्यांच्या हिताचा स्पष्ट दृष्टिकोन उमटला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. पानसरे होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार, अमृत धुमाळ, अजीत कदम, दिलीप जठार, उपसभापती बाळासाहेब खुळे आणि सर्व संचालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्या प्रकारे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी बाजार समितीचे कामकाज सुरू आहे, त्यामुळे ती नक्कीच महाराष्ट्रातील पहिल्या १० उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये स्थान मिळवेल. याच पद्धतीने आपण साखर कारखान्याची पुढील वाटचाल करावी लागेल. सहकार खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन कारखान्यास सर्वतोपरी मदत करू.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक करत सांगितले, “शेतकरी भवन व उपहारगृहाची इमारत १ कोटी ८० लाख रुपये खर्चुन उभारण्यात आली आहे. समितीकडे १९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. लवकरच सूतगिरणी सुरु केली जाणार आहे.

फळांचा बाजार सुरू करणार असून खुला कांदा विक्री प्रयोग नाशिक लासलगावप्रमाणे राबवणार आहोत’ ‘युवा नेते डॉ. तनपुरे, कारखाना संचालक हर्ष तनपुरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सूत्रसंचालन कविता जेजुरकर, तर आभार संचालक भारत वारुळे यांनी मानले. तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी, अधिकारी, कर्मचारी, महिला, युवक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!