अहिल्यानगर- शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्री विशाल गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
महाआरतीनंतर माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मफंड ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देत मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. मंदिराच्या वतीने अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी भाविकांच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करताना म्हणाले, श्री विशाल गणपती हे नगरकरांचे ग्रामदैवत असून शहरातील प्रत्येक धार्मिक, सामाजिक वा कौटुंबिक शुभकार्याची सुरुवात याच ठिकाणाहून होते. सध्या दर चतुर्थीला मुंबई, पुणे, बीडसह नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.

गणेशोत्सव काळात तर नेपाळ व परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. मात्र भाविकांसाठी राहण्याची सोय नसल्यामुळे भक्तनिवासाची गरज भासू लागली आहे. ट्रस्टच्या मालकीची चार हजार चौरस फुट जागा मंदिरालगत उपलब्ध आहे. शासनाने निधी दिल्यास भाविकांसाठी मोठी सोय होईल.
या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री विशाल गणपती मंदिर हे नगरचे आध्यात्मिक केंद्र असून भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास उभारणे अत्यावश्यक आहे. शासन स्तरावरून यासंबंधी सकारात्मक पावले उचलली जातील. नगर विकास खात्यांतर्गत या योजनेसाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्वर रासकर, हरिचंद्र गिरमे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, संजय चाफे, प्रा. माणिक विधाते, नितीन पुंड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.