राहुरी- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे २७ जुलै २०२५ रोजी राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते बाजार समितीने बांधलेल्या शेतकरी भवन आणि उपहारगृह यांचे उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर चेअरमन अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर आठवड्याभरात तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. या वेळी अजित पवार यांनी अहिल्यानगर दौऱ्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, येत्या रविवारी २७ जुलै रोजी ते राहुरी तालुक्यात येत आहेत.
यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याच्या अडचणींबाबत ते काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या भवितव्यासंदर्भात त्यांच्या भाषणातून काही ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.