संगमनेरमध्ये कुरेशी समाजाने कत्तलखाने बंद केल्याच्या निर्णयानंतरही शहरात खुलेआम कत्तलखाने सुरूच, पोलिसांकडून दुर्लक्ष

Published on -

संगमनेर- कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय मुस्लिमांच्या राज्यस्तरीय संघटनेने घेऊनही संगमनेर शहरातील कत्तलखाने खुलेआम सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील कुरेशी समाजातील कत्तलखाना चालकांनी कत्तलखाने बंद केल्यानंतर याचा फायदा घेत अन्य नागरिकांनी शहरातील विविध भागात कत्तलखाने सुरू केले आहेत.

पोलीस प्रशासनाचे मात्र या कत्तलखांन्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरांमध्ये वर्षानुवर्षे खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. हे कत्तलखाने बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. आमदार अमोल खताळ यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कत्तलखाने बंद करण्याची सूचना केली होती. यानंतर काही दिवस पोलिसांनी कत्तलखांन्याबाबत कारवाईची भूमिका घेतली होती.

यामुळे शहरातील कत्तलखान्यांना काही प्रमाणात लगाम बसला होता. कत्तलखान्यांमुळे कुरेशी समाजावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनेने घेतला होता. या निर्णयामुळे शहरातील कत्तलखाना चालकांनी काही दिवसांपासून कत्तलखाने बंद केले आहेत. याचा गैरफायदा घेऊन अन्य काही नागरिकांनी कत्तलखाने सुरू केले आहेत. संगमनेर शहरातील रहेमतनगर (डोगरेचा मळा), परदेशपुरा डी.एड. कॉलेज, कुरण रोड, बिलाल नगर वीट भट्टी परिसर, एकतानगर, नुरु पैलवानच्या मळ्यासमोर, प्रवराच्या मोठ्या पुलाखाली, कुरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर कत्तलखाने जोरात सुरू करण्यात आले आहेत.

संगमनेर शहरामध्ये तयार होणारे गोमांस कुरणमधून मागच्या रस्त्याने नाशिक ते मुंबई या ठिकाणी विविध वाहनांमधून पाठवले जात आहे. या गावांमधून रोज मध्यरात्री १ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गोमांस वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. संगमनेर शहरातून व कुरणमधून काही पोलीस आर्थिक लाभघेत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन अशा पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!