कुकाणा- वरखेड येथे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक स्वरूपात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम यंदाही उत्साहात पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या जीवघेण्या प्रकाराला विरोध करत आयोजकांवर कारवाईची मागणी केली होती. तरीही शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत १२ गाड्या ओढण्यात आल्या.
वरखेड यात्रेतील १२ गाड्या ओढण्याचा प्रकार जीवघेणा असून, तो थांबवण्यासाठी आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, असे निवेदन अंनिसच्या रंजना गवांदे आणि बाबा आरगडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले होते. त्यामुळे या वर्षी गाड्या ओढल्या जातील की नाही याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती.

वरखेड माता देवस्थानचे सचिव कडुबाळ गोरे यांनी गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाशी देवस्थानचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ही परंपरा बाहेरील भाविक मंडळींनी आयोजित केलेली असून, देवस्थानतर्फे त्याला मान्यता दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर नुकतीच पोलीस ठाण्यात अंनिस पदाधिकारी, देवस्थान पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यातही देवस्थानकडून स्वतःची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
मात्र, त्या सर्व घडामोडी असूनही शुक्रवारच्या दिवशी बारा गाड्या ओढण्यात आल्या आणि त्यासाठी भाविकांनी हजेरी लावली.