श्रीरामपूर- राजूर येथील आदिवासी प्रकल्पामधील निष्क्रीय आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी छावा ब्रिगेडच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले, की संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करत छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून, या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

तसेच, २०२३ साली अग्निशमन नळकांड्याच्या टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार करण्यात आला. एका संस्थेला कोणताही अनुभव नसतानाही त्याचे टेंडर देण्यात आले. मार्च २०२३ मध्ये ही संस्था नोंदणीकृत झाली असून, त्याच महिन्यात त्यांना टेंडर देण्यात आले. संस्थेला अनुभव नसतानाही तसेच कोणतेही मागील बिल नसताना टेंडर देण्यात आल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवितासोबत खेळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.
निवेदनप्रसंगी छावा ब्रिगेडचे प्रदेश महासचिव राहुल रेळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, अहिल्यानगर संपर्कप्रमुख एजाज पठाण, जावेद सय्यद, मनोज भोसले, भरत तावरे, प्रीतम माने यांच्यासह अनेक छावा ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.