खरिप हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, मका पिकांवर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशीवर मावा अन् तुडतुड्यांचा हल्ला

Published on -

टाकळीभान- खरीप हंगाम सुरु होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असताना पावसाने पुन्हा दडी मारल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहीले आहे.

श्रीरामपूर पुर्व परीसरातील टाकळीभान, खोकर, भोकर, कारेगाव, भेर्डापूर, कमालपूर, खानापूर, भामाठाण, माळवाडगाव, बाजाठाण, मुठेवाडगाव, गुजरवाडी, खिर्डी, या परीसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी व मका पिकांची लागवड झाली आहे. पिके जवळपास एक महिन्याची झाली असून वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, गेल्या वीस दिवसांपासून या परीसरात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकायला सुरूवात केली आहे. त्यातच हवामान विभागाच्या – अंदाजानुसार पुढील काही दिवस कोरडे हवामान वर्तवले असल्याने – शेतकऱ्यांमधे मोठी चिंता पसरली आहे.

एकीकडे शेतकरी पावसाच्या खंडामुळे चिंतेत असताना दुसरीकडे विविध पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैरान झाला आहे. उगवुन आलेल्या सोयाबीनची पाने पिवळी पडली असून रोपे कोमेजुन जात आहे. महत्वाचे चारापिक मानल्या जाणाऱ्या मका पिकावर अमेरीकन लष्करी अळीने हल्ला केल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे. तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परीणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना किटकनाशक, बुरशीनाशक व अळीनाशक फवारणीचा अतिरीक्त खर्च वाढला आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी एकीकडे किडरोगांशी लढा देत आहे. तर दुसरीकडे पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे पाहत आहे. अमेरीकन लष्करी अळीच्या झुंडीने मका पिकावर आक्रमण करुन पिक फस्त करतात. त्यामुळे वेळीच अळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!