श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती, आमदार विक्रम पाचपुतेंसह शिवसेना उपनेते साजन पाचपुतेंना मोठा धक्का

Published on -

श्रीगोंदा- श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांच्या विरुद्ध काढलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली. या आदेशाने आमदार विक्रम पाचपुते तसेच बाजार समितीचे तत्कालीन संचालक शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीचे तत्कालीन संचालक शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी बाजार समितीच्या गैरकारभाराबाबत तक्रार करीत संचालक मंडळ बरखास्तीसह सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांच्या अपात्रतेची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी होऊन महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम तसचे त्यातील उपविधीचा एका पेक्षा अधिक वेळा भंग केल्याचा ठपका ठेवत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांना संचालकपद व सभापती पदावरून अपात्र करण्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काढले होते.

या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी सभापती लोखंडे यांनी विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्याकडे अपिल अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर लोखंडे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने मंगळवार दि.१५ रोजी निकाल जाहीर करीत प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली.

स्थानिक पातळीवर झालेल्या राजकारणातील दबावापोटी काही गोष्टी घडल्या. न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असल्याने शेवटी न्यायालयात न्याय मिळाला. आगोदर प्रमाणेच बाजार समितीच्या हिताला प्राधान्य देऊन सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करत बाजार समितीच्या नावलौकिकात भर घालणार.

– प्रवीण उर्फ अतुल लोखंडे सभापती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!